ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, तुळजापूर : (Tuljabhavani Mandir) नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक तीर्थक्षेत्र आणि श्रद्धास्थळांवर भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षात आगामी दिवसांमध्येही ही गर्दी कायमच राहणार असून, सुट्ट्यांचा एकंदर ओघ आणि पर्यटक, भाविकांचा सध्या तीर्थक्षेत्रांकडे असणारा कल पाहता महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर निर्णयानुसार आठवड्यातील मंगळवार शुक्रवार आणि रविवारी जुळजाभवानीचं मंदिर रात्री एक वाजता उघडणार आहे. तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी वाढती गर्दी पाहता चालू वर्षात म्हणजेच 2025 मध्ये दर आठवड्याच्या मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे एक वाजता उघडण्यात येणार आहे.
हा बदल 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये लागू राहणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानानं घेतला आहे. भाविकांची गर्दी पाहता आठवड्यातील मंगळवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी मंदिर राञी एक वाजता खुले करण्याची मागणी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळाकडून करण्यात आली होती.ज्यावर विचारविनिमयानंतर निर्मय घेत मंदिर संस्थानकडून यासाठीचं रितसर पत्रकही जारी केलं आहे.