Maharaj Statue Arabian Sea : अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
संभाजीराजे छत्रपती आज शिवस्मारकाच्या शोधात बाहेर पडले.दुर्बिणीतून समुद्रात दूरवर पाहूनही संभाजीराजे छत्रपतींना शिवरायांचं स्मारक काही दिसत नाही. आठ वर्षांपूर्वी म्हणजे 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाची जलपूजन केलं. पण या स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही.
स्मारक रखडल्यानं संभाजीराजेंनी स्वतः स्मारक शोधण्याच्या मोहिमेची उपरोधिक घोषणा केली. संभाजीराजे कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाजवळ कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. शेवटी निवडक कार्यकर्त्यांसह संभाजीराजेंनी शिवस्मारकाची पाहणी केली.
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा राज्यातल्या अकरा कोटी जनतेनं शोध घ्यावा असं आवाहन संजय राऊतांनी केलं.शिवस्मारक झालं पाहिजे ही भाजपची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. शिवस्मारक होऊ नये यासाठी कोण कोर्टात गेलं याचा शोध घेतला पाहिजे असंही फडणवीस म्हणालेत.
एकही वीट न रचली गेलेल्या शिवस्मारकासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय. एकेकाळी अरबी समुद्रातलं शिवस्मारक हा निवडणुकीचा मुद्दा झाला होता. या मुद्यावर भाजपनं मतांचा जोगवा मागितला होता. पण स्मारकाची सध्याची स्थिती काय?.. हे स्मारक का होत नाही याबाबत भाजप काहीही बोलायला तयार नाही हे मात्र न उलगडणारं कोडं आहे.
'चला शिवस्मारक शोधायला' अशा घोषणा देत पुण्याहून निघालेल्या संभाजी राजे छत्रपतींच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं.यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.संभाजीराजे अरबी समुद्राकडे जाण्यावर ठाम आहेत. तर संभाजीराजे छत्रपतींनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.तर 5 हजार तिकीट काढले आणि दुर्बिणीतून पाहू आणि स्मारकाचं अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.शिवस्मारक पाहण्यासाठी आम्ही येथे आल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.माझं हे आंदोलन नाहीये तुम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणाल तर चालेल.मुंबाई देशाची आर्थिक राजधानी आहे.मुंबईत छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे ही पहिली मागणी शाहू महाराज यांनी केली.सगळा खर्च मी करतो असं त्यांनी मुंबई महापालिकेला संगितलं होतं. यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांनी सांगितलं. भाजपने जाहीरनाम्यात सांगितलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपुजन केलं पण सगळ्या परवानग्या घेऊन काम कुठे अडलं? असा प्रश्न त्यांनी विचारला. गुजरातमध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचे स्मारक उभे राहू शकते. पण अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाहीय. मी या गोष्टीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. यात पर्यावरणचे अडचण झाली आहे. यासंदर्भात कोर्टात विषय झाला आहे. सरकारला प्रश्न पडला आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे. समिती स्थापन केली आहे. एल अँड टीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. मग पुढे काय झालं? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला.