धुळे : गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता असणाऱ्या धुळे महापालिकेत सत्ता पालटासाठी धुळेकरांनी कौल दिला आहे. भाजपानं एकूण ७४ जागा पैकी भाजपानं तब्बल ५० जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे. विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार हदारा बसला आहे. विशेष म्हणजे एमआयआयएमचे २ तर अनिल गोटेंच्या लोकसंग्रामचा अवघा एक नगरसेवक निवडून आला आहे. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
दुसरीकडे धुळ्यात गुंडांनाच राजकीय संरक्षण मिळाल्यानं भीतीपोटी लोकांनी भाजपला मतं दिली, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाची पार धूळधाण झाली. मात्र आपण हे अपयश मानत नाही. राष्ट्रवादीतून आयात केलेले गुंड, भाजपनं गुंडांना दिलेलं राजकीय संरक्षण, पैशांचा महापूर आणि मतदान यंत्रातील घोळ या पराभवाला कारणीभूत असल्याचं विश्लेषण गोटेंनी केलं आहे.