योगेश खरे / नाशिक : कोरोनाचा ( Coronavirus) उद्रेक होत असताना दुसरीकडे तुटवडा जाणवत आहे. मात्र, असे असताना काही लोक रेमडेसिवीर ( Remedesivir) औषध विक्रीचा काळाबाजार (Black market) करत असल्याचे पुढे आले आहे. हा काळाबाजार अद्याप सुरु आहे. (Black market for sale of Remedesivir continues in Nashik) रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या सतर्कतेने महामार्गावर विकणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, रेमडेसिवीर औषध विक्री वितरणावर नियंत्रण असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे.
नाशिक शहरात कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार अद्यापही सुरू असल्याचं समोर येत आहे. हाय प्रोफाईल होंडा सिटी गाडीतून रात्रीच्या सुमारास अंधारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकली जात आहेत. अमोल रमेश जाधव आणि निलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तरुणांकडून रेमडेसिवीर औषध आणि गाडी जप्त केली आहे.
हे दोन्ही तरुण चार हजाराचे इंजेक्शन चोवीस हजार रुपये प्रमाणे 48 हजाराला दोन इंजेक्शन विक्री करत होते. नाशिक शहरातील मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये या दोघांचे लागेबांधे असल्याची चर्चा असल्याने नागरिकांनी सतर्कतेने या मुलांना पकडून देत पोलिसांच्या हवाली केले. मात्र नागरिक करत असलेल्या तक्रारी यांना पोलिसांकडून तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत नागरिक आणि समाजसेवक करत आहेत.