विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ब्लू व्हेल गेमनं जगभरात गोंधळ माजवलाय. हा गेम खेळतांना जगात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे अशा प्रकारचे गेम बंद करावे अशी मागणीही होतेय. केंद्र सरकारनंही या मागणीची दखल घेत या गेमवर बंदी आणलीये. मात्र तरीही हा गेम अगदी सहजपणे डाऊनलोड करता येतोय. हातच्या मोबाईलमध्ये हा गेम असल्यानं ब्लू व्हेलचा हा धोका अजूनही आपल्या डोक्यावरच आहे.
जवळपास ५० हून अधिक देशात हा गेम खेळल्या जातोय. ब्लू व्हेल गेम खेळण्याच्या नादात भारतातही काही लोकांनी आपला जीव गमावलाय. अखेर यावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. संसदेतही आवाज उठवण्यात आला आणि या गेमवर केंद्र सरकारनं बंदी आणली.
इतकंच नाही तर इंटरनेटवर लिंक्स दिसू नयेत यासाठी सोशल नेटवर्किंग साईटला सूचना आणि आदेशही देण्यात आलेत. असं असलं तरी सहजपणे अगदी गुगल प्ले स्टोअरसह इंटरनेटवर या लिंक सहज उपलब्ध आहेत. सरकारच्या आदेशानंतरही सोशल नेटवर्किंग साईटनं वा गुगलनं याची गंभीर दखल घेतली नसल्याचं पहायला मिळतंय. इतकंच नाही तर काही वेगळ्या नावांनीही हा गेम सहज उपलब्ध आहे. ही नावं युझरला गेम अॅडमिनिस्ट्रेटकडून पुरवल्या जातायत.
केंद्र सरकारनं आदेश दिल्यानंतर दोन दिवस हा गेम उपलब्ध झाला नाही मात्र त्यानंतर नावात फक्त एक अक्षर वाढवण्यात आलं आणि गेम उपलब्ध झालाय. अगदी शेअर इट सारख्या माध्यमातूनही हा गेम पसरतोय. त्यामुळं गेममध्ये काय आहे याची चाचपणी करण्यासाठी आणि त्यावर बंदी आणण्यासाठी यंत्रणेची गरज व्यक्त केली जातेय.
एखाद्या गोष्टीवर बंदी आणली की ती जास्त हवीहवीशी वाटते. ब्लू व्हेलच्या बाबतीतही हेच पहायला मिळतंय. सर्च डेटाबेसनुसार 3 महिन्यात देशातील 14 कोटी लोकांनी ब्लू व्हेल नाव सर्च केलंय. यात मुंबई आघाडीवर आहे. आता हे लोण ग्रामीण भागातही पसरतंय. धक्कादायक म्हणजे हा गेम फक्त मोबाईलवरच खेळता येत असल्यानं सतत सोबत राहतो. मानसिकतेलाच छळणारा हा गेम असल्यानं यावर संपूर्ण बंदी आणण्यासाठी कडक उपाययोजनेची गरज आहे.