मुंबई : आज शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालय मुंबई येथे सुनावणी झाली. आनंद अडसूळ यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
उच्च न्यायालयाने अडसुळांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते.
आनंदराव अडसूळांवर आरोप काय?
मुंबईत 27 शाखा असलेल्या सिटी सहकारी बँकेवर घोटाळ्यामुळे 2018 पासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. आनंद अडसूळ हे या बँकेचे अध्यक्ष असून, अभिजित अडसूळ हे संचालक आहेत. नियमबाह्य कर्ज दिल्यानेच ही बँक घोटाळ्यात अडकली आणि त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा ईडीचा संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने तपास सुरू केला आहे. सिटी सहकारी बँकेत जवळपास 90 हजार ठेवीदार आहेत.