पुणे : राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गेले दीड महिना एसटी कर्मचारी संपावर आहेत. तर दुसरीकडे एसटीच्या पुणे विभागीय कार्यालय परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरातच हाय-फाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा खच सापडला आहे.
त्यामुळे एसटीचे हे विभागीय सरकारी कार्यालय दारूड्यांचे आगारच बनले आहे की काय असा प्रश्न विचारला जात आहे. एसटीच्या या कार्यालयाला 24 तास ‘सुरम सुरक्षा’ची सिक्युरिटी तैनात असते. मग या बाटल्या कोणाच्या? हे सरकारी कार्यालय आहे की, दारूड्यांचा अड्डा असा सवाल आता विचारला जात आहे.
विशेष म्हणजे सापडलेल्या दारुच्या बाटल्या या महागड्या ब्रँडच्या आहेत. त्यामुळे या पार्ट्या नेमकं कोण करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, एसटी कार्यालयात दारूच्या बाटल्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असं एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. एसटीच्या विभागीय कार्यालया अंतर्गत अशा प्रकारच्या दारूच्या बाटल्या सापडणे हे निंदनीय आहे, खात्याची प्रतिमा मलीन होत असून, संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांची कडक चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.