bull birthday in bhiwandi : एक अनोखा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा वाढदिवस एका रेड्याचा असून या रेड्याच नाव टीट्या आहे. त्याचा वाढदिवस अख्या गावाने साजरा केला. एखाद्या राजकिय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच पूर्ण गावाने जल्लोष केला. भिवंडीत रेड्याच्या बर्थ डे चे जंगी सेलिब्रेशन झाले.
भिवंडी तालुक्यामधील लाखीवली गावात रहाणारे तांडेल यांचा हा रेडा असून त्याचा तिसरा वाढदिवस जोरदार साजरा करण्याचे त्यांनी ठरवल. तांडेल कुटूंबाचे त्यांच्या टिट्या वर खूप प्रेम असून तो झुंज खेळण्यात पटाईत आहे. त्याने आतापर्यत अनेक झुंजी खेळून पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळवलीय. त्यामुळेच अत्यंत लाडका असणाऱ्या टिट्याला तांडेल कुटुंबियांनी वाढ दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी त्याला सजवलं विविध पदार्थ तयार केले खास केकही तयार केला. एवढंच नाही तर पूर्ण गावाला जंगी पार्टी दिली आणि रात्री फटाक्यांची आतिशबाजी करून जोशात त्याचा वाढदिवस साजरा केला. या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'सबसे कातिल गौतमी पाटील' असं तरुणाई सातत्यानं म्हणताना दिसते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. गौतमीच्या कार्यक्रमात राडा देखील होतो. मात्र आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलीय. गौतमीचा चक्क एका बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बाव-या असं या बैलाचं नाव आहे. बैलगाडा शर्यतीचं प्रतीक म्हणून या बाव-या बैलाला कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गौतमी पाटील बाव-या बैलासमोर नाचली. मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा लाडका कुत्रा खंडूचा वाढदिवस जोरदार साजरा केला. या वाढदिवसाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. हा खंडू श्वान सर्वसामान्य नाहीये तर त्याचं इंस्टाग्रामवर ही अकाउंट आहे. केक कापून, फटाके फोडून खंडू भाईचा वाढदिवस साजरा केला.
कोरोनाकाळात डोंबिवलीतील चक्क बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत डीजे पार्टी करत धिंगाणा घालण्यात आला होता. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा मोठी गर्दी जमवण्यात आली होती. याप्रकरणी विष्णू नगर पोलीसांनी बैलाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.