नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले मग, करार कसा झाला? - राष्ट्रवादी

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले. मग हा प्रकल्प होतोच कसा?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2018, 08:30 PM IST
नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले मग, करार कसा  झाला? - राष्ट्रवादी title=

मुंबई : कोकणात होऊ घातलेल्या राजापूर येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादीने शिवसेनेला घेरले आहे. तुम्ही (शिवसेना) नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले, हे मोठ्या तोंडाने प्रकल्पस्थळी सांगितले. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी शिवसेनेला अर्थात उद्योग मंत्र्यांना केलाय.

गुजरातच्या लोकांची जमीन खरेदी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रुपयांचा करार झाला. नोटीफिकेशन रद्द केले असेल तर हा करार झालाच कसा? , असा सवाल मलिक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.

पर्यावरणाला दूषित करणारा प्रकल्प येऊ नये. लोकांना प्रकल्प नको असेल तर सरकारने माघार घ्यावी. जनतेवर अन्याय करु नये. हा प्रकल्प होत आहे म्हणून गुजरात आणि इतर राज्यातील लोकांनी येथे जमीन खरेदी केली. या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

प्लास्टिक बंदीवरुन थेट प्रश्न

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र आता असे लक्षात येते की तोडपाणी, जनतेला त्रास देणे, बेरोजगारीला आमंत्रण देणे यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सरकारने ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजवर बंदी घातलेली नाही, खरंतर यांच्या आवरणांचा पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिक नाईफ, चमचा, ग्लास, कॅरी बॅग या वस्तूंवर बंदी घातली आहे. या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. मग या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी का? , असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.