नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर

वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीने दोन महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झाले आहे. त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे...

Updated: Jun 1, 2017, 11:15 PM IST
नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर  title=

पुणे : वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीने दोन महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झाले आहे. त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे...

पुण्यात वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्ही कंट्रोल रुममधून संपूर्ण पुणे शहरातील वाहतूकीवर नजर ठेवली जातेय. पुण्यातील जवळपास तीनशे चौकात 1250 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना टिपलं जातं. 

एप्रिलमध्ये हा कंट्रोल रुम स्थापन केला तेंव्हापासून दोन महिन्यात 1 लाख 31 हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पीएमपीएमएल आणि एसटीच्या बस सह एक हजारच्यावर सरकारी वाहनांचा देखील समावेश आहे. 

तिसऱ्या डोळ्याने टिपलेल्या या सव्वा लाख बेशिस्त वाहन चालकांपैकी 24 हजार जणांनी दंड भरला आहे. दंडाची पद्धत ही ऑनलाईन. नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचा फोटो संगणकावर काढला जातो. लगेच संगणकाद्वारेच वाहन चालकाच्या फोनवर फोटोची लिंक आणि दंडाचा एसएमएस पाठवला जातो. वाहन चालकाचा फोन नंबर नसेल तर वाहन नोंदवले गेलेल्या पत्यावर दंडाची नोटीस बजावण्यात येते. एसएमएस कींवा नोटीस मिळूनही दंड भरला नाही तर, दुसऱ्या वेळेस नियम भंग झाल्यास अशा वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स कायमचे रद्द केले जाणार आहे. 

वाहतूक पोलीसांकडील पावती पुस्तकही इतिहास जमा झालंय.  पोलिसांकडे स्वाईप मशीन आली आहेत. वाहतूक नियम मोडताना सीसीटीव्हीने टिपलं तर, दंड फक्त एकाच कारणासाठी होत नाही. म्हणजे, दुचाकी चालकाने सिग्नल तोडला तर सिग्नल तोडण्यासाठी आणि हेल्मेट घातले नसेल तर त्यासाठी देखील दंड होतो. त्यामुळे पुणेकरांनो वाहन चालवताना सावधान, तुमच्यावर तिसऱ्या डोळ्याची नजर आहे.