'मैं यही हू...' धनंजय मुंडेंच्या बंगल्याबाहेर भुजबळांची प्रतिक्रिया

 भुजबळांना त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी विचारले असता मैं यही हू असे तीनदा त्यांनी ठणकावून सांगितले.

Updated: Aug 27, 2019, 11:31 PM IST
'मैं यही हू...' धनंजय मुंडेंच्या बंगल्याबाहेर भुजबळांची प्रतिक्रिया

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू असतानाच आज भुजबळांनी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळांना त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी विचारले असता मैं यही हू असे तीनदा त्यांनी ठणकावून सांगितले.

मागील काही दिवस भुगबळ पक्षापासून आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात असताना त्यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या यात्रेलाही ते आले नाहीत. 

एवढंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना फोन केला पण भुजबळांनी तो फोन घेतला नाही. छगन भुजबळ यांना मी फोन केला होता, पण आजारी असल्यामुळे त्यांनी आपला फोन उचलला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. नाशिकला त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रत्येक जण पक्ष सोडण्यासाठी कारखाना किंवा बँकांची चौकशी अशी कारणं सांगत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला जाण्याच्या शुभेच्छा. पण प्रत्येकाने शरद पवार यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांची, वर्षांची आठवण ठेवावी. आमच्या मनात क्लिमिश नसेल, पण प्रत्येकाला शुभेच्छा, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले होते. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीपासून दूर गेल्याची चर्चा होती. त्यातच आज मुंबईत येऊन त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यामुळे भुजबळ नक्की काय करणार ? अशी चर्चा सुरू झाली आहे.