मुंबई : दूध दर वाढीसाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी हा इशारा दिला आहे. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी आपली जनावरं घेऊन राज्यभर चक्का जाम करायचं आवाहन, राजू शेट्टींनी केलं आहे. वेळप्रसंगी महिलांनी मुलाबाळांसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करायचं आवाहनही राजू शेट्टींनी केलं आहे.
दरम्यान, गुजरातमधून महामार्गाने येणारं दूध रोखल्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राजू शेट्टी यांनी रेल्वेनं मुंबईत येणारं दूध रोखण्यासाठी मोर्चा डहाणूकडे वळवलाय. काल रात्रभर गुजरातमधून येणारे ४० टँकर शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालघरच्या दापचरी नाक्यावरून परत पाठवले. त्यामुळे ६ ते ७ लाख लीटर दूध परत गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईत दूध कमी पडू नये म्हणून गुजरातमधून पश्चिम रेल्वेचे १२ टँकर रवाना झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. आता हे दूध सुद्धा रोखण्याचा राजू शेट्टींचा प्रयत्न आहे.
दूधाच्या दरावर पाच रुपये अनुदान मिळावं यासाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर दूध बंदीचं आंदोलन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे येणाऱ्या दूधावर या आंदोलनाचा स्पष्ट परिणाम दिसतोय. राज्याच्या अनेक भागात हे आंदोलन आता चिघळताना दिसतंय.