'पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण'; चंद्रकांत पाटील यांची टीका

सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Updated: May 5, 2019, 07:59 PM IST
'पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण'; चंद्रकांत पाटील यांची टीका title=

कोल्हापूर : सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शरद पवार माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण करत आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज असल्याचंही पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या सुचनेचं पालन केलं जाईल. ते ग्रेट माणूस आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जुन-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे पीक चांगलं येईल असं वाटलं, पण परिस्थिती बदलली. कधी नाही तेवढी मदत केंद्राने जाहीर केली. पण केंद्राच्या पैशांची वाट न बघता आम्ही मदत केली. टँकर देण्याची पद्धत बदलली आणि २४ तासात पाणी देण्याचं नियोजन केलं. जून अखेरपर्यंत पुरेल इतका चाऱ्याचा साठा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पवार साहेबांना काय झालंय माहिती नाही, पण त्यांच्या काळात गुराला ४० रुपये दिले जात होते, पण आता ९५ रुपये दिले जात असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच शरद पवार काहीच मानायला तयार नाहीत, आचारसंहिता मानायला तयार नाहीत. कोर्टाचा निर्णयही मानायला तयार नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हाणला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्यांची माहिती दिली.

काय म्हणाले होते शरद पवार?

- राज्यात दुष्काळी स्थिती परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यात पडला नाही त्यामुळे निर्माण झाली आहे

- दुष्काळात पिण्याचं पाणी, लोकांना रोजगार, पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या याची व्यवस्था सरकारला करावी लागते

- दुष्काळात फळबाग गेली तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते

- या दुष्काळात राज्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे

- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिष्टमंडळासह त्यांना भेटतील

- आमच्या काळात काय उपाययोजना केल्या जातील याची माहिती दिली जाईल

- आमचे सरकार असताना फळबागा वाचवण्यासाठी अनुदान दिले होते

- फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे ही मागणी

- चारा छावण्यात पूर्वी सरसकट जनावरं घेतली जात होती, आता पाचच जनावरं घेतली जातात ही अट काढावी

- चारा छावणीत ९० रुपये जनावारे मागे दिले जातात, ते वाढवावे

- सध्या जनावरांना ऊसाचं वाडं चारा म्हणून दिलं जातं, त्याबरोबर हिरवा चारा, पेंड उपलब्ध करून द्यावी 

- सर्व प्रकारच्या वसुली थांबवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा

- शेतकर्यांने घेतलेलं कर्ज तो फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी आणि पुनर्गठण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल

- जूनमध्ये शालेय, महाविद्यालयीन प्रवेश सुरू होतील त्यामुळे प्रवेश फी माफी द्यावी

- विद्यार्थ्यांना दोन वेळ जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही दुष्काळात घेतला होता, तसा निर्णय घ्यावा

- दुष्काळात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, तालुका अध्यक्ष, विद्यार्थी संघटना काम करतील

- निवडणूक आयोगाकडे आम्ही फोनवर माहिती द्यायचो दुष्काळातील कामं करायची आहेत, निवडणूक आयोग दोन ते तीन तासात परवानगी द्यायचे

- निवडणूक आयोगातील नियमावली दुष्काळी कामात आड येत नाही

- मी दुष्काळी दौर्‍यावर गेलो नसतो तर सरकारच्या बैठका झाल्या नसत्या, मंत्र्यानी दौरे केले नसते

- आता तडफडणारे पशुधन वाचवा