परळी: कुटुंबात भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते गुरुवारी परळीच्या गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महादेव जानकर आणि एकनाथ खडसे यांनी व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. खडसे यांनी तर भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचे पद्धतशीर वाभाडे काढले. तसेच आता मी पक्षात राहीन, याचा भरवसा धरू नका, असा इशाराही खडसे यांनी दिला.
तुम्ही आम्हाला त्रास दिला हे मान्य करा; जानकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला
यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच नाराज नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचे नसते. चुका या पक्षाकडून नव्हे तर माणसांकडून झाल्या. त्यामुळे पक्षावर राग कशासाठी काढता? आता आणखी बोलून जखमा करू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना उद्देशून म्हटले.
पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे
तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या कामाची जाणीव भाजपला अजूनही आहेच. त्यामुळेच मी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे आलो आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजप सर्व समाजाचा पक्ष झाला. रोहिणी खडसे यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. त्यावर उत्तरही शोधली जातील आणि भविष्यात तशी वेळ येणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.