चंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखूवर सरसकट बंदी आहे. हाच तंबाखू वापरून विदर्भ आणि राज्यात खर्रा हा मुखशुद्धीचा प्रकार तयार करून सेवन केला जातो. विदर्भातली शहरे आणि गावांमध्ये प्रत्येक पानटपरीवर हे बिनदिक्कतपणे सुरु आहे.
खर्रा हा शौक अथवा व्यसन शासकीय निधीतून पूर्ण केले जात असेल तर... हे मनोरंजक तर आहेच मात्र शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळा येथील ग्रामसेवकाने आपल्या व्यसनाचा खर्च चक्क ग्रामपंचायतीच्या माथी मारलाय.
तंबाखू-सुपारी मिश्रीत मुख शुद्धीकरण पदार्थ म्हणजे खर्रा' हाच विदर्भाचा खर्रा, व-हाडात बार, तर पश्चिम महाराष्ट्रात मावा म्हणून ओळखला जातो.. खर्रा या पदार्थाचे मोठे शौकीन विदर्भात आहेत. हाच शौक पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या चुनाळा ग्रामपंचायतीनं चक्क शासकीय पैसे वापरले.
ग्रामपंचायतीमध्ये आयोजित प्रत्येक बैठकांना खर्रा शौकीन उपस्थित राहायचे. मग काय, बैठक संपली की, चहा आणि खर्रा अत्यावश्यक. हा खर्रा स्वपैशांनी घेतला असता तर एकदाचं समजून घेता आलं असतं, पण त्यासाठी शासकीय निधी खर्च केला गेला.
चहाच्या बिलासोबत खर्ऱ्याचंही बिल शासकीय निधीतून मंजूर करण्यात आलं. चुनाळा ग्रामपंचायतीच्या बाहेरच एक पानटपरी आहे. तिथं चहा आणि खर्रा उपलब्ध आहे. त्यामुळं इथंच ग्रामपंचायतची ख-यासाठी घेतलेली शासकीय उधारी देखील आहे.
एकतर सुगंधित तंबाखू म्हणजे नियमभंग, त्यातही असा तंबाखू वापरून तयार केलेला खर्रा अर्थात नियमबाह्य आणि वर त्याचे पैसे शासकीय खर्चातून म्हणजे आनंदी -आनंदच. प्रत्येक महिन्यात खर्ऱ्यासाठी शासकीय निधी दिला जात आहे.
ज्या ग्रामविकास अधिका-याची आणि सरपंचाची ही जबाबदारी आहे, त्यांनीच या नियमाला हरताळ फासला आहे. महिन्याकाठी ८० ते ९० खर्रे इथं मागवले जातात. हा खर्रा देणा-या पानटपरीचालकाला याविषयी विचारल्यावर तेव्हा त्यानं याची कबूली दिली.
हा गंभीर प्रकार आजवर इथल्या सदस्यांना आणि विरोधकांनाही माहिती नव्हता. ब-याचदा त्यांनी खर्चाचा हिशेब आणि बिलांची मागणी केली, पण ग्रामविकास अधिका-यांनी तो दिला नाही. हा अधिकारी मुजोरीनं वागत असल्यानं अनेकदा त्याच्या तक्रारीही करण्यात आल्या, पण काहीही झालं नाही. आता नव्यानं या प्रकाराची तक्रार करणार असल्याचं सदस्यांनी सांगितलं.
चुनाळा ग्रामपंचायत ही स्वतःचे शौक- व्यसने पूर्ण करण्यासाठी शासकीय निधीचा असा वापर करणारी कदाचित ही पहिलीच ग्रामपंचायत असावी. धन्य ते अधिकारी आणि ही बिले मंजूर करणारे वरिष्ठ. हे सर्व खर्रा प्रेमी असण्याची शक्यता असल्याने कारवाई कोण आणि कुणावर करतील हा 'खर्रा' प्रश्न आहे.