मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 15, 2024, 01:18 PM IST
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण title=
Chhagan bhujbal Meeting Sharad Pawar on Silver Oak ove maratha and obc reservation

Maharashtra Politics News: छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ आणि पवारांच्या भेटीमुळं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषेद घेतली. त्यावेळी ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पवारांची भेट घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, मी आज पवार साहेबांची भेट घेतली अर्थात त्या साठी मी काही त्यांची वेळ घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत इतकं मला कळलं होतं. मी तिथे गेलो होतो. परंतु ते तब्येत बरी नसल्याने झोपलेले होते. त्यामुळं मी एक दीड तास थांबलो. नंतर त्यांनी मला बोलवलं. आमच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. मी आज त्यांना सागंतिले मी कोणतंही राजकारण घेऊन आलं नाही, मंत्री, आमदार म्हणून आलो नाही.

'महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहे ते मराठा समाजाचं हॉटल आहे तर तिथे जात नाहीत. काही लोक ओबीसी समाजाचं दुकान असेल तिथे मराठा समाज जात नाही. राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची एक जबाबदारी आहे. ही शांतता  राखली पाहिजे,' असं भुजबळांनी म्हटलं, त्यांनी पुढे नमूद केलं की, मी पवारांना आठवण करुन दिली की, बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असतानाचा असाच मराठवाडा पेटला होता. अशा वेळी तो शांत करुन तुम्ही निर्णय घेतला तेव्हा तुम्ही सरकारचं काय होईल ते होईल अशी भूमिका देऊन आपण हे काम केले आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलं.

भुजबळ पुढे म्हणतात, 'पवारांचं असं म्हणणं होतं की जरांगेंना मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली. आश्वासने दिली हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही हाकेंचं उपोषण सोडायला गेलात तेव्हा त्यांना काय सांगितले याची आम्हाला कल्पना नाही. जरांगेंना मंत्री भेटले ते काही माहिती नाही, यावर मी त्यांना म्हटलं की ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आज राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. सर्व सामाज घटकांची जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजण्याचे कारण नाही. त्यामुळं तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे,' असंही भुजबळांनी म्हटलं आहे. 

'तुम्ही बैठकीला बोलवा आम्ही तुमच्याकडे यायला तायर आहोत, असं मी त्यांना म्हणालो त्यावर पवार म्हणाले येत्या एक दोन दिवसांत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलतो. त्यानंतर आम्ही एक दोन लोक सोबत घेतो आणि काय झालं आणि काय करायला पाहिजे यावर आम्ही चर्चा करुन आणि काय मार्ग काढायचा हे ठरवू,' अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. 

दरम्यान, हा प्रश्न सोडवावा सुटावा यासाठी मी कोणालाही भेटालयला तयार आहे. राहुल गांधींनाही भेटायलाही तयार आहे. परंतु हा प्रश्न शांत झाला पाहिजे. हा यामागचा माझा हेतू आहे. यात कोणतंही राजकारण नाही, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.