कसा होता शिवरायांचा आहार? महाराजांनी इथंही पाळलेली शिस्त; ते शाकाहारी होते की मांसाहारी, पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Diet : छत्रपती शिवाजी महाराज, हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हे रयतेचे राजे आणि राजेंसंदर्भातील प्रत्येक गोष्ट, माहिती म्हणजे अनेकांसाठी प्रमाण.   

सायली पाटील | Updated: Aug 28, 2024, 02:06 PM IST
कसा होता शिवरायांचा आहार? महाराजांनी इथंही पाळलेली शिस्त; ते शाकाहारी होते की मांसाहारी, पाहा...  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ Chhatrapati Shivaji Maharaj Diet does he eat veg or non veg historians decode

Chhatrapati Shivaji Maharaj Diet : छत्रपती शिवाजी महाराज... हे नाव उच्चारतानाच एक वेगळा उत्साह आणि उर्जा स्फूरते. कारण, महाराजांचे पराक्रम इतके अद्वितीय की, त्यांचा जीवनकाळ कायमच सर्वांसाठी प्रेरणा देत राहिला. अशा या छत्रपतींच्या व्यक्तीमत्त्वानंही अनेकांसाठी आदर्श प्रस्थापिक केला. त्यांच्याविषयी जे लिहिलं गेलं, जे संदर्भ आढळले, त्यांचे जे विचार बखरींमधून समोर आले ते अनेकांसाठीच प्रमाण ठरले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? हा प्रश्न आणि त्यावरही अनेक मतमतांतरं झाली. पण, काही संदर्भांतून याविषयीचं नेमकं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 

आहार आणि युद्ध यांच्यातील थेट संबंध महाराजांनी ओळखला होता. त्यामुळं सैन्याच्या आहारासमवेत ते स्वत:च्य़ा आहाराविषयीसुद्धा अतिशय काटेकोर आणि शिस्तप्रिय असल्याचं म्हटलं गेलं. काही संदर्भांनुसार महाराजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, दूध, लोणी दही तूपाचा वापर होत होता. सैन्यासाठीही या गोष्टींचा वापर त्या काळात केला जात असेल. शिवबा मांसाहारी होते असे थेट संदर्भ नसून बहुतांश वेळा इतिहासात शाकाराची नोंद दिसते. काही नोंदींनुसार महाराज शाकाहारी असले तरीही मांसाहार करणाऱ्यांना त्यांचा विरोध नव्हता ही लक्षात घेण्याजोगी बाब. 

इतिहासकार काय म्हणतात? 

मिथ्य की सत्य, या संकल्पनेअंतर्गत इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीही महाराजांच्या आहाराविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. काही संदर्भ पाहिले असता महाराजांच्या खानपानाच्या सवयी स्पष्ट होत होत्या, असं सांगत त्यांनी काही प्रसंगांची नोंद मांडली. 

सावंत यांच्या सांगण्यानुसार पहिला संदर्भ आहे जेव्हा शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत सापडल्याप्रसंगीचा. तेव्हा शिवाजी महाराज तिथं सुकामेवा खात होते आणि एक वेळ जेवत होते असा असा उल्लेख आढळतो. 

शिवाजी महाराजांच्या आहाराच्या सवयींचे थेट संदर्भ नसले तरीही इतर संदर्भांचा आढावा घेतल्यास शिवाजी महाराज मराठा होते. म्हणजे त्यांच्या घरात मांसाहार चालत होता अशी नाण्याची दुसरी बाजू समोर येते. फक्त शिवाजी महाराज नव्हे तर, संभाजी महाराजही मत्त्स्याहारी होते, किंबहुना त्यांच्यावर मत्स्य आहारातूनच विषप्रयोग झाल्याचेही संदर्भ आहेत. सावंत यांनी काही संदर्भ मांडल्यानुसार छत्रपती घराण्याच्या परंपरा पाहिल्या असता, तर भोसले कुळाचं कुलदैवत आहे तुळजापूरची भवानी देवी. सर्व ठिकाणी या भवानी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो किंवा देवीला बकऱ्याचा बळी आजही दिला जातो. याचाच अर्थ असा की आजचे जे छत्रपती आहेत मग ते सातारचे असो किंवा कोल्हापूरचे असो या दोन्ही घराण्यांमध्ये आजही सरसकट मांसाहार सुरू आहे. 

शिवाजी महाराजांचा मांसाहाराला विरोध नव्हता याचं उत्तम उदाहरण सावंत यांनी दिलं. 'रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज वकील हेन्री आणि त्यांचे सहकारी आले होते. तेव्हा त्यांना राज्याभिषेकाआधी गडावर वास्तव्यास बोलवण्यात आलं होतं. हा अतिशय पवित्र सोहळा असताना आणि गडावर अनेक ब्राह्मण असतानाही हेन्रीला खाण्यासाठी लागणारं मांस गडावर रायगडवाडीतून पोहोचवण्याची व्यवस्था महाराजांनी केली होती. तो इतकं मांस खात होता की खाटिक एकदा इतकं मांस कोण खातं हे बघायला आला होता. थोडक्यात रायगडावर मांस खाण्यास बंदी नव्हती हे समजतं',असं ते म्हणाले.  

इतिहासातील नोंदी पाहता प्रतापगडावर शिवरायांनी भवानी देवीचं मंदिर बांधलं आणि नदीतून शिळा आणणाऱ्या येसाजी पानसरे यांना मंदिराचा हवाला सांगितला. त्यामध्ये मिळालेल्या पत्रांमध्ये देवीच्या नैवेद्याला बकरं लागणार असल्याची नोंद आहे. रायगडची शिरकाई देवी, प्रतापगडावरची भवानी देवी यांनाही बळी दिली जात होती. सिंधुदुर्गात असणाऱ्या शिवरायांच्या मंदिरात मंदिरासमोर कधीकाळी महाराजांच्याच एका तलवारीनं तिथं बळी दिला जात होता हे वास्तव. 

हेसुद्धा वाचा : रविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं

 

कोल्हापुरात करवीर छत्रपतींच्या भवानी देवीला आजही काही वार वगळले तर दररोज मांसाचा नैवेद्य दाखवला जातो असं सावंत सांगतात. दसऱ्याला आजही करवीर संस्थानी बकऱ्याचा बळी दिला जातो. त्याचा वाटा आजही छत्रपतींपर्यंत जातो, ही लक्षात घेण्याजोगी बाब. बकऱ्याच्या बळी देण्याची प्रथा शिवकालीन दिवसांपासून चालत आली आणि महाराजांनीही त्या प्रथांना विरोध केला नसल्याचे संदर्भ इतिहासातील काही प्रसंगांमध्ये आढळतात. त्या काळात तोफांपासून सिंहासन, शेजघरातले पलंग आणि अगदी ध्वज- पताक्यासाठीही प्रत्येक गोष्टीसाठी बकऱ्याचा बळी दिला जात होता. 

छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाराही ही बाब, किंवा याविषयी आजही अनेकांची मतमतांतरं आहेत. पण, इतिहासातील काही संदर्भ या चर्चेदरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सात्तत्यानं समोर आणत असतात हे खरं.