Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज (सोमवार, 13 फेब्रुवारी 2024) 394 वी जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्तानं (Shiv Jayanti 2024) राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतानाच राजांच्या जन्मस्थळी वेगळाच माहोल पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. यासाठी किल्ले शिवनेरीवर हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. शिवनेरीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, शिवजन्मोत्सवात सहभागी होणार आहेत. फक्त शिवनेरीच नव्हे, तर राज्यातील विविध गडकिल्ल्यांवरही अनेक संस्थांच्या वतीनं शिवजन्मोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिवनेरी गडावर सोमवारी सकाळी 6 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मथळ अशी पालखी मिरवणूक निघाली. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टरने किल्ले शिवनेरीवर आगमन होईल ज्यानंतर पाळणा गाऊन हा सोहळा पार पडणार असून पोलीस मानवंदना, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
1595 मध्ये शिवबांचे आजोबा मालोजी भोसले अहमदनगरचे सुलतान बहादूर निजाम शाह यांच्या दरबारी प्रमुख सरदार म्हणून नेमले गेले होते. निजामानंच त्यांना जहागीर म्हणून शिवनेरी आणि चाकणचा प्रांत दिला होता. याच शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. अवघ्या दोन वर्षांमध्येच सुरक्षा आणि तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमुळं जिजाऊंना हा किल्ला बाळराजांसह सोडावा लागला.
1673 मध्ये हा किल्ला महाराजांनी परत काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रयत्न अपयशी ठरला. पुढे राजांच्या जीवनकाळात हा किल्ला मुघलांच्याच ताब्यात राहिला. अखेर 40 वर्षांनंतर हा किल्ला मराठा साम्राज्याकडे परत आला. 1716 मध्ये हाच किल्ला शाहू महाराज यांच्या राजवटीत पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला.
नैसर्गिक कडे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याला तटबंदी केल्यानं तो अभेद्य राहिला. यामध्ये भर घातली ती म्हणजे 7 बलाढ्य दरवाजांनी. महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, कुलूप दरवाजा कुलाबकर दरवाजा असे हे सात दरवाजे किल्ल्याची राखण करतात. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा, शिवाई देवीचं मंदिर, अंबरखाना, गंगा जमुना टाकी, शिवकुंज, महाराजांचा जन्म वाडा, बदामी तलाव, कडेलोट टोक अशी ठिकाणं तुम्ही इथं पाहू शकता.