प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरातील विशाळगडावर 'कंदीलपुष्प' वर्गातील नवीन प्रजाती सापडली आहे. या नवीन प्रजातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या अनोख्या पद्धतीने संशोधकांनी महाराजां प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहारातील अक्षय जंगम, रतन मोरे, डॉ. निलेश पवार तसेच नाशिक मधील चांदवड इथले डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावर 'कंदील पुष्प' वर्गातील नवीन प्रजाती शोधली आहे.
नवीन प्रजातीचे सेरोपेजिया 'शिवरायीना' (Shivarayina) असं नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या 'फायटोटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात झाला आहे. अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली.
भारतामधील कंदीलपुष्प वर्गाचे तज्ज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे पण सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली असता ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव,ज्यांनी या सेरोपेजिया वर्गाला भारतभर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत या वर्गातील 6 नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी अंतिम निरीक्षणानंतर सदर वनस्पती ही नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब केले.
तसेच त्या संबंधी शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठविणेत आला. नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. या नवीन प्रजातील महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणले आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच राखीव केली असं संशोधकांचे म्हणणे आहे.