विजय सुर्वे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्योर्तिंलिंग भीमाशंकर दौऱ्यावर असताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वळसे-पाटील यांच्या निवासस्थानी नाष्टा आणि चहा ही घेतला.
मुख्यमंत्री सायंकाळी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेवून महापूजा आरती करणार आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर राज्याचे मुख्यमंत्री श्रावण महिन्यात भीमाशंकराच्या दर्शनाला उपस्थित आहेत.
शिवसेनेतील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसैनिकांची संख्या वाढत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या घरी आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. पण आढळरावांच्या घरी जाण्याच्या आधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
अचानकपणे दौऱ्यात बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री हे थेट दिलीप वळसे पाटील यांचे निवासस्थानी पोहोचले. मंचरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत ही झाले. मुख्यमंत्र्यासोबत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.