मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'

मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2024, 01:35 PM IST
मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...' title=

मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा निर्णय निवडणुकीपुरता नसून कायमस्वरुपी असल्याचं सांगितलं आहे. तसंच हा एक ऐतिहासिक निर्णय असून, मास्टरस्ट्रोक असल्याचंही म्हटलं. 

"मुंबईच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्रातील अनेक लोक येतात. तिथे वाहतूक कोंडी होते. मागील अनेक वर्षांपासून लोकांची टोलमधून सुटका करण्याची मागणी होती. अनेकजण कोर्टात गेले होते, मीदेखील कोर्टात गेलो होतो. मी आमदार असताना टोलविरोधात आंदोलन केलं होतं. मला आज आनंद, समाधानी आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात आज लाखो कार प्रवाशांना टोलमाफी मिळाली आहे. मध्यमवर्गीय, लाखो लोकांना दिसाला मिळणार आहे.  यामुळे त्यांचा वेळ, इंधन वाचेल. प्रदूषण होणार नाही. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हा मास्टरस्ट्रोक आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
 
पुढे ते म्हणाले, "हे सरकार सर्वामान्यांना न्याय देणारं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडका भाऊ, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना यानंतर आता मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना आणली आहे".  

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे का? असं विचारला असता ते म्हणाले. "हा निर्णय निवडणुकीपुरता नाही. हा निर्णय कायमस्वरुपी आहे. राजस्थान, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात ज्याप्रमाणे निवडणूक जुमला काढला, आश्वासन दिलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत, केंद्राकडे पैसे द्यावे असं म्हणाले. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. आमच्या योजना निवडणूक जोळ्यासमोर ठेवून केलेल्या नाहीत. लाडकी बहीण, शिक्षण योजना सुरु केल्या तेव्हा निवडणुका नव्हत्या. लाडकी बहीण योजनेची तयारी करायला एक वर्षं लागलं. ही जनतेची गेल्या अनेक वर्षापासून होती ती पूर्ण केली, याचं समाधान आहे. याची पोचपावती जनता निवडणुकीत नक्की देईल". त्यांना फक्त टोल घेण्याची सवय आहे. घेणं माहिती आहे, देणं नाही. आमची देना बँक आहे, त्यांची लेना बँक आहे असा टोलाही त्यांना लगावला. 

'बाबा सिद्धीकींच्या मारेकऱ्यांना फाशी देणार'

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर विरोधक कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. "आरोपीने पोलिसांवर गोळी चालवली तर पोलिसांनी गोळी का चालवली? असं विचारतात. हे डबल ढोलकीवाले आहेत. यांच्यात काही नैतिकता नाही. बदलापूरमधील आरोपीची बाजू घेणारे हे लोक काय कायद्याची भाषा करतात". 

बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. "बाबा सिद्धीकी लोकप्रतिनिधी होते. दोघांना अटक केली असून एक फऱार आहे, त्याला लवकर पकडलं जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढून फाशी देण्याची विनंती करु. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही," असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 
 
"महाविकास आघाडीत तर गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती. उद्योगपतीच्या घऱाखाली बॉम्ब लावत होते, त्यात पोलीस सहभागी होती. गॉटेलमधून पैसे वसूल करत होते. त्यावेळी गृहमत्री जेलमध्ये होते. आता जो कायदा हातात घेईल त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. फाशीची शिक्षा दिली जाणार. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार," असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.