अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : विदर्भाच नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पर्यटन कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यापासून बंद होते. मात्र अनलॉक चारमध्ये मेळघाटातील सौंदर्याचा अनुभव आता पर्यटकांना घेता येणार आहे. मेळघाटातील चिखलदरा मधील पर्यटन सुरू झालं असून मेळघाटात आता पुन्हा पर्यटकांची हळूहळू रेलचेल सुरू झाली आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे.
दऱ्या खोऱ्यात वसलेलं मेळघाट हे त्याच्या निसर्ग सौंदर्याने प्रसिद्ध आहे. शिवाय या ठिकाणी असलेला व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. परंतु कोरोनामूळे येथील पर्यटन बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका येथील नागरिकांना बसला आहे.
आता अनलॉक दरम्यान राज्यातील अनेक गोष्टी सुरू होत असताच चिखलदरा मधील पर्यटनाला शासनाने नियम व अटी ठेऊन परवानगी दिली आहे. त्यामुळे पाच महिन्यापासून बंद असलेले सर्वच व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे येथील व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले असून पर्यटक सुद्धा आता येण्यास सुरुवात झाली आहे.
मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. या भागांतील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाह चिखलदरा मधील पर्यटनावर असतो. दरम्यान आता चिखलदरा मधील पर्यटन पुन्हा एकदा सुरू झाल्याने येथील आदिवासी बांधवांच्या हाताला काम मिळणार आहे.