कल्याण : सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त आहेत. आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करु, असा इशारा देत कल्याण ग्रामीणमधील आडवली गावात नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.
तीन दिवसापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासूनच पुन्हा पावसाने कल्याण-डोंबिवलीमध्ये जोरदार बॅटिंग केल्याने एकच दाणादाण उडवून दिली आहे. काल दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसामुळे कल्याण मलंग रोडवरील आडीवली गावातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं तर काही चाळीमध्ये देखील पाणी शिरले होते.
आडीवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे. रस्त्याची दुरुस्ती होत नाही. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या समस्याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी माजी नगरसेवकासह रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले.
यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला.तसेच येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर 27 गावाला जोडणारे सर्व रस्ते बंद करून रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला.