नवा वाद : मराठा आरक्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स आधी CM शिंदे नेमकं काय म्हणाले? पाहा Video

Shinde Fadnavis Pawar Press Conference Viral Video: मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृहामधील पत्रकार परिषदेपूर्वीच्या या व्हिडीओवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 13, 2023, 03:42 PM IST
नवा वाद : मराठा आरक्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स आधी CM शिंदे नेमकं काय म्हणाले? पाहा Video title=
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला फुटलं तोंड

Shinde Fadnavis Pawar Press Conference Viral Video: मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पत्रकार परिषद सुरु होण्याआधी नेमका काय संवाद झालेला, हे तिघे एकमेकांनी नक्की काय बोलले आणि यावरुन आता कोणी काय म्हटलं आहे यावर नजर टाकूयात...

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठक मुंबईमध्ये घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांसमोर आल्यानंतर प्रश्नोत्तर सुरु होण्याआधीच आल्या आल्या माईकसमोर शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेला संवाद समोर आला आहे. तिन्ही नेत्यांना माईक सुरु असल्याची कल्पना नसल्याचं या व्हिडीओमधून लक्षात येत आहे. पत्रकारांसमोर आल्या आल्या मुख्यमंत्री शिंदेंनी, "आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं," असं फडणवीस आणि अजित पवारांकडे पाहत म्हटलं. पुढे मुख्यमंत्र्यांनी 'बोलून मोकळं व्हायचं,' असंही म्हटलं. यावर अजित पवार यांनी, 'हो... यस' असा प्रतिसाद दिला. हा संवाद सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या कानात, 'माईक चालू आहे' असं सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी माईकवर हाताने स्पर्श करुन, 'ऐकू येतं...' असं म्हटलं.

वडेट्टीवार यांनी पोस्ट केला व्हिडीओ

हा व्हिडीओ विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स अकाऊंटवरुन (ट्वीटर अकाऊंटवरुन) पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना वडेट्टीवार यांनी, "सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे 'नाकर्ते सरकार' राज्याचा कारभार हाकत आहे," अशी टीका केली आहे.

शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भात पोस्ट करुन आपलं म्हणणं मांडलं आहे. "मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे," असं शिंदे म्हणालेत.

तसेच, "मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सध्या या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.