Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
"बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी नेलं जात होतं. त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने चौकशासाठी नेलं जात होतं. यादरम्यान त्याने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अन्य पोलीसही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
"मुलीवर अत्याचार केल्यानंतर विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. पण आता माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्याची बाजू घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. हे निंदाजनक असून, निषेध करावा तितका थोडा आहे. विरोधी पक्षाला जे हवं ते बोलण्याचा अधिकार आहे. एक पोलीस जखमी आहे, त्याचं यांना काही देणंघेणं आहे. जे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करतात, सणांना थंडी वाऱ्यात, पावसात उभे राहून काम करतात. त्यांच्यावर आक्षेप घेणे, प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही," अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवली आहे. बिथरल्याने पराभव दिसत असून त्यामुळे आरोप करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.