मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या रणजीत सावरकरांच्या पदरी निराशा

मध्य प्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक वाटण्यात आले.

Updated: Jan 4, 2020, 07:43 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या रणजीत सावरकरांच्या पदरी निराशा  title=

नवी दिल्ली : काँग्रेस सेवा दलाच्या वादग्रस्त पुस्तकाप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट झाली नाही. हा माझा नव्हे तर सावरकरांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेस सेवा दलाच्या 'त्या' वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. मध्य प्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक वाटण्यात आले.

मी मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी अनेक निवेदने दिली पण मला आज देखील भेट देण्यात आली नाही. त्यांच्याकडे माझ्यासोबत बोलायला एक मिनिट देखील वेळ नाही आहे. हे सावरकरांच्या सन्माना संदर्भात असून मी खूप निराश आहे. हा सावरकरांचा अपमान असल्याचे रणजित सावरकर म्हणाले.

राहुल गांधी आणि काँग्रेस सेवा दलावर गुन्हा दाखल व्हायला हवा असेही रणजीत सावरकर म्हणाले. 

सावरकरांचे नथूराम गोडसेसोबत समलैंगिक संबंध होते असे धक्कादायक विधान या पुस्तकात करण्यात आले आहे. सावरकर १२ वर्षांचे असताना त्यांनी मशिदीवर दगडफेक केली होती. अल्पसंख्याक समाजातल्या महिलांवर बलात्कार करण्यासाठी सावरकर अनुयायांना उकसवत असत, असंही या पुस्तिकेत म्हटले आहे. शत्रूच्या महिलांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणं हे राजकीय हत्यार असल्याचं सावरकरांचं मत होतं. याचं समर्थन करताना 'रावणानं सीतेला पळवून आणणं हा अधर्म नव्हता, तर तो परम धर्म होता', असं सावरकर सांगायचे, असं पुस्तिकेत म्हटले आहे.

'पुस्तक बेकायदेशीर'

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या पुस्तिकेवर निशाणा साधला आहे. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. हे पुस्तक अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. सावरकरांविषयी आम्हाला कोणीही ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर या देशाला प्रिय आहेत आणि राहतील. फालतू पुस्तकामुळे सावरकरांविषयी श्रद्धा कमी होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.