कोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

Updated: Apr 14, 2020, 09:05 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा title=

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. या टास्क फोर्समध्ये हार्ट स्पेशलिस्ट, किडनी विषयक तज्ज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर या टास्क फोर्समध्ये आहेत. कालपासून या टास्क फोर्समधल्या डॉक्टरांनी काम करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांना कोणत्या पद्धतीने उपचार करावेत, यासाठीची मार्गदर्शक तत्त्व ही टास्क फोर्स ठरवणार आहे. डॉक्टर संजय ओक यांच्या नेतृत्वात हा टास्क फोर्स काम करणार आहे. डॉक्टर ओक यांच्यासोबत खासगी क्षेत्रातील डॉक्टर, महापालिकेतले डॉक्टर, सरकारी डॉक्टर या टास्क फोर्समध्ये आहेत. 

मुंबई आणि महाराष्ट्रात कोविड आणि नॉन कोविड अशी हॉस्पिटलची विभागणी सरकार करत आहे. कोविड असणाऱ्यांना कुठे न्यायचं, तसंच इतर आजार असणाऱ्या रुग्णांना कुठे न्यायचं यासाठी विभागणी करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कोरोनाचं संकट गेल्यानंतर आर्थिक संकट येऊ शकतं. या संकटाचा सामना करण्यासाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रिगट तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथील करताना कसा शिथील करावा? कोणाला परवानगी द्यायची? आर्थिक धोरण काय असलं पाहिजे? याचा अभ्यास मंत्रिगट करेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

डॉक्टर रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दीपक पारेख, अजित रानडे अशा नामवंत अर्थतज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला कमीत कमी धक्का कसा बसेल, तसंच कोरोनाच्या संकटानंतर पुढची झेप घेताना काय करायला हवं? या सगळ्याचा रिपोर्ट ही टीम देईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x