जयेश जगड, झी मीडिया, अकोला : गुजरातमध्ये सुरत येथील कोचिंग क्लासला आग लागली, यात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर अकोला अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभीर्याने घेत कठोर कारवाई सुरू केली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही तीन क्लासेस सील करण्यात आले.
शहरातील अनेक कोचिंग क्लासेसनी नियमांची पायमल्ली केली आहे. त्यात विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने अशा क्लासेसची तपासणी करत संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानंतर ६४ कोचिंग क्लासेसपैकी, केवळ २० कोचिंग क्लासेसने अग्नी सुरक्षेतेबाबत उपयोजना सुरु केल्या आहेत. दरम्यान, सूचना देऊनही उपाययोजना न करणाऱ्या कोचिंग क्लासेस संचालकांना नोटीस बजावून ३१ मे पर्यत मुदत देण्यात आली होती.
मात्र सूचनाचं पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर आज सलग दुसऱ्या दिवशीही मनपाच्या अग्निशमन विभागानं कारवाई करत क्लासेस सील केले आहेत. त्यात आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना तसेच भारत बांधकाम संहितेनुसार कोणतीही कार्यवाही केली नसलेल्या कोचिंग क्लासेसचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील प्रा. अजय कुटे अकॅडमी, प्रा. प्रशांत देशमुख यांच्या सरस्वती कोचिंग क्लासेस, प्रा. अजरांबर गावंडे यांचा युनिक कोचिंग क्लास, प्रा. पाध्ये यांच्या आकाश एज्युकेशन कोचिंग क्लास, वसीम चौधरी आणि सपकाळ यांचा सरस्वती कोचिंग अशा एकूण सात क्लासेसला महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे सिल लावले आहेत
मात्र विद्यार्थ्यांकडून लाखोंची फी वसुल करणारे कोचिंग क्लासेस त्यांच्या जीवाशी खेळत आहेत, हे निश्चितच धक्कादायक आहे.