पैशांच्या आमिषात कॉलेज तरुण करतात मोबाईल चोऱ्या!

ठाणे स्थानकातून वाढलेल्या मोबाईल चोर्‍यांचे प्रकार वाढलेत. मात्र, त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे त्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचा वापर केला जातोय. चोरांच्या टोळक्यात कॉलेजातल्या मुलांना सामावून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Updated: Nov 23, 2017, 03:10 PM IST
पैशांच्या आमिषात कॉलेज तरुण करतात मोबाईल चोऱ्या! title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे स्थानकातून वाढलेल्या मोबाईल चोर्‍यांचे प्रकार वाढलेत. मात्र, त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे त्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचा वापर केला जातोय. चोरांच्या टोळक्यात कॉलेजातल्या मुलांना सामावून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

स्थानकात मोबाईल चोऱ्यांत वाढ

ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास १५ ते २० मोबाईल चोरीला जात आहेत. जीआरपी पोलीस स्थानकात सकाळपासून तक्रारदारांची रिघच लागलेली असते. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी एक टोळी पकडली. त्या टोळीकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.

कॉलेज तरूणांना पैशांचं आमीष

ही टोळी चोरीच्यावेळी वेगवेगळ्या तरूणांना सोबत घेते. महाविद्यालयीन तरूणांना पैशांची लालूच दाखवून चोरी करण्यास भाग पाडलं जातं. चोरीसाठी ठाणे स्थानकात शिरायला आणि पळायला बरेच अधिकृत अनधिकृत मार्ग आहेत. त्यांचा वापर केला जातो. चोऱ्या करणाऱ्या बऱ्याचशा टोळ्या मुंब्रा  आणि ठाणे भागातल्या आहेत. 

स्थानकातून लोकल सुटल्यावर वेग कमी असताना प्रवाशाच्या हातून मोबाईल हिसकावणे, सिग्नलला लोकल थांबल्यावर हातावर वार करून मोबाईल चोरणे, बॅग आणि खिशातू नकळत मोबाईल लंपास करणे अशाप्रकारे चोऱ्या केल्या जातात. 

सर्वसामान्य घरातली मुलं

मोबाईल टोळ्यांमध्ये सर्वसामान्य घरातली मुलं सहभागी होत असल्याचं वास्तव धक्कादायक आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी, व्यसनं पूर्ण करण्यासाठी, कॉलेज लाईफ छानछोकीत जगण्यासाठी तरूण टोळ्यांकडे आकर्षित होत असल्याचं दिसून आलंय. पण त्याचसोबत घरची परिस्थिती ठीक नाही म्हणूनही टोळ्यांमध्ये तरूण सहभागी होतात. तर कधी कधी फिल्म बघून फक्त एक थ्रिल म्हणूनही चोऱ्या केल्या जातात.

चोरी करणं थ्रील नाही गुन्हा आहे

चोरलेले मोबाईल पुढे मोबाईल दुरूस्त करणाऱ्यांकडे नेले जातात. तिथे मोबाईल पार्ट सुटे करून विकले जातात. त्यामुळे एकदा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा सापडणं शक्यच नसतं. मोबाईल चोरीला जाणं हे आर्थिक नुकसान आहेच यात वाद नाही. पण त्यापेक्षाही वाईट म्हणजे चांगल्या घरातले तरूण असे मोबाईल चोरांकडे आकर्षित होत असतील तर ती जास्त काळजीची बाब आहे.