नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला

मंगळवारी सकाळी नागपुरातून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर याचा एक कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय.  

Updated: Nov 23, 2017, 02:16 PM IST
नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला  title=

नागपूर : मंगळवारी सकाळी नागपुरातून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर याचा एक कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय.  

ज्या दिवशी अपहरण झाले त्याच दिवशी पाच तासाच्या आत अपहरण कर्त्यांनी राहुलचा खून करून मृतदेह जाळून टाकला.

सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील लॉटरी व्यावसायिक राहुल आगरेकर घरून निघाला... थोडया वेळात परत येतो असे सांगत निघालेला राहुल परत आलाच नाही. दुपारी चारच्या सुमारास राहुलचा भाऊ जयेशच्या मोबाईलवर आरोपींनी फोन करून एक कोटी रुपयांची मागणी केली.

मात्र, त्यानंतर आरोपींनी कुठलाच संपर्क केला नाही... नागपूर नजिकच्या बुटीबोरी शिवराजवळ जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना मंगळवारी संध्याकाळी मिळाला. मृतदेहासोबत मिळालेल्या वस्तूंवरून हा मृतदेह राहुलचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दुसरीकडे आरोपींचा कसून शोध घेण्यात येत असून दोघांची ओळख पटली आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.