महादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर

 महादेव जानकर यांना काँग्रेसकडून खुली ऑफर 

Updated: Feb 2, 2020, 05:57 PM IST
महादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर  title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून आमदार-खासदार आता जनतेची सेवा करण्यात व्यस्त आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेते मोठ्या प्रमाणात भाजप सोबत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक घटक पक्ष देखील भाजप सोबत राहीले. दरम्यान काँग्रेस सध्या शिवसेनेसोबत सत्तेत असून त्यांनीही इतर पक्षाच्या नेत्यांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) सर्वेसर्वा महादेव जानकर यांना काँग्रेसकडून खुली ऑफर आली आहे.

जानकर यांच्यासारखे कष्ट करणारे वजनदार नेते सर्वच राजकीय पक्षांना हवेत. त्यामुळे जानकर यांनी काँग्रेसमध्ये यावं अशी ऑफर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील आयोजित एका कार्यक्रमात सातव यांनी जानकरांना ही ऑफर देण्यात आली आहे.

आता पंकजा ताईंचं भाजपमध्ये फारसं काही चालत नाही. त्यामुळे या ऑफरचा विचार करावा असा सल्ला देखील सातव यांनी दिला. दरम्यान या ऑफरवर बोलण्यास जानकर यांनी नकार दिला आहे.

भाजपला कानपिचक्या 

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपला चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून मिळालेल्या वागणुकीची सव्याज परतफेड त्यांनी केली होती. व्यासपीठावर बसलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलेच टोले लगावले होते.

यावेळी जानकर यांनी म्हटले की, आम्ही भाजपचा घटकपक्ष आहोत. तुम्ही आम्हाला कितीही त्रास दिलात तरी आम्ही तुमच्यासोबत राहू. मात्र तुमच्याकडून त्रास देण्यात आला ही बाब मान्य करावीच लागेल. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपशी जोडले गेलो. भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे झाले तर आम्हीच आणू, असे जानकर यांनी म्हटले.