काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या दिवगंत नेत्याचा फोटो झळकला...

दादर इथल्या काँग्रेस प्रदेश मुख्यालयात नुकताच राज्यभरातल्या वंजारी समाज युवकांचा मेळावा पार पडला. पण या सगळ्यात मेळाव्यामध्ये चर्चा झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसच्या बॅनरवरील फोटोची. 

Updated: May 22, 2022, 05:41 PM IST
काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या दिवगंत नेत्याचा फोटो झळकला... title=

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यात भाजपचा विस्तार करणारे गोपीनाथ मुंडे यांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली. पण आजही मुंडे हे नाव घेतल्याशिवाय अनेकांचं राजकारण पूर्ण होत नाही. याच गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची भुरळ काँग्रेस पक्षाला पडली की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याला कारण म्हणजे काँग्रेसच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो झळकल्याने साऱ्याच्या भुवया उंचावल्या. 

नुकतेच मुंबईतील दादर इथल्या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात राज्यभरातल्या वंजारी समाज युवकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच मंचावर प्रदेश काँग्रेसचे अनेक बडे नेतेमंडळीनी सुध्दा उपस्थिती लावली होती. पण या सगळ्यात कार्यक्रमात चर्चा झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोची. कार्यक्रमस्थळी मंचामागे लावलेल्या बॅनरवर सोनिया गांधी, राहुल गांधी, नाना पटोले आणि वरच्या बाजूला गोपीनाथ मुंडे यांचा फोटो झळकल्याचे पाह्यला मिळाले.

काँग्रेसचे वंजारी समाजाकडे विशेष लक्ष
काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रदेश मुख्यालयात वंजारी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.  राज्यात वंजारी समाजाची मोठी राजकीय ताकद आहे. हा समाज गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत इतकी वर्ष असल्याचे चित्र होते. पण मुंडे यांच्या निधनानंतर समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

नाना पटोले भगवान गडावर जाणार
भगवान गड हे वंजारी समाजाचे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. समाजाची गडावर मोठी श्रद्धा आहे. दरवर्षी भगवान बाबांचे लाखो अनुयायी गडाच्या दर्शनासाठी जातात. या भगवान गडाला राजकीय शक्तीपीठ म्हणूनही पाहिले जाते. म्हणूनच या भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर जाणार असल्याचे नाना पटोलेंनी जाहीर केले आहे. राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर जून महिन्यात नाना पटोले भगवान गडावर जाणार आहेत अशी माहिती त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिली. 
 
गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करायचंय - नाना पटोले
राज्यात सध्या सुरु असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटोले यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. आमचे पक्ष वेगळे असले तरी आमचे विचार एक होते, अशी भावना पटोले यांनी व्यक्त केली. ओबीसींच्या मुद्द्यांवरून कायमच मुंडेंनी आपल्याला सहकार्य केल्याचे पटोलेंनी सांगितले. शिवाय, ओबीसी समाजाला मोठी राजकीय ताकद बनवण्याचं गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही नाना पटोले यांनी कार्यक्रमात दिली.