मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा, भाजपात करणार प्रवेश?

Ashok Chavan Resignation from Congress: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2024, 04:07 PM IST
मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा, भाजपात करणार प्रवेश? title=

Ashok Chavan Resignation from Congress Latest News: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजीनामा सोपवण्यासाठीच अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले होते अशी माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्धीकी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत.

भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल असून, नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. 

 

यापूर्वीही उठल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेणार असे दावे यापूर्वीच करण्यात आले होते. जुलै 2023 मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल दावा केला होता. अशा प्रकारचा दावा करणारे ते एकटे नव्हते. डिसेंबर 2023 मध्ये नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही अशोकराव चव्हाण भाजपमध्ये येणार असे संकेत दिले होते.

शिवसेना पक्ष फुटण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असताना शिवसेना त्यावेळच्या संभावित बंडखोर आमदारांसह त्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अशोक चव्हाण यांनी स्वतः मीडियासमोर येऊन अशा चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "मी यापूर्वीही त्यांचं भाजपात स्वागत आहे असं सांगितलं होतं. माझं आणि त्यांचं काही वैयक्तिक भांडण नाही. आम्ही दोघे राजकीय विरोधक आहोत. पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल. अशोक चव्हाणांपेक्षा मोठे नेते भाजपात आहेत. तसंच अशोक चव्हाणांसह जे काही 2-3 आमदार असतील भविष्यात तेही प्रवेश करु शकतात. भाजपा आधीचा ताकदवान असून ते पक्षात आल्याने ताकद वाढणार आहे. ".