काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनपेक्षित डाव; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

Updated: Sep 14, 2019, 03:15 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनपेक्षित डाव; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी साताऱ्यात उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून तसे आदेशही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. 

आघाडीच्या सध्याच्या समीकरणांनुसार साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार होणार का, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना ही जागा त्यांच्यासाठी सोडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील अपक्ष निवडणूक लढतील, असेही सांगितले जात आहे. परिणामी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 

उदयनराजे भोसले यांना या सगळ्याची चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी दोन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. आपल्याला सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी. तसेच लोकसभा निवडणुकीत दगाफटका झाल्यास आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, याची कबुली उदयनराजेंनी भाजपकडून घेतली आहे.