close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपुरात काँग्रेस नेत्यांची एकमेकांना जीवे मारण्याची धमकी

इंधन दरवाढीविरोधात आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते एकत्र आल्याचं चित्र क्षणिक ठरलंय. कारण नागपुरात  नेत्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. 

अमर काणे | Updated: Sep 11, 2018, 09:30 PM IST
नागपुरात काँग्रेस नेत्यांची एकमेकांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर : इंधन दरवाढीविरोधात भाजपला घेरण्यासाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्याच घरी आग लागण्याची चिन्हं आहेत. सोमवारी इंधन दरवाढीविरोधात आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते एकत्र आल्याचं चित्र क्षणिक ठरलंय. कारण नागपुरात  नेत्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. 

रामनगर परिसरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेते एकत्र आंदोलन करत असल्याची दृश्ये अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना सुखावणारी होती. मात्र हे चित्र क्षणिक होतं. कारण या आंदोलनात काँग्रेस नेत्यांमध्ये झालेली हमरीतुमरी थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलीय. 

नागपूर महापालिका विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे ज्येष्ठ  नगरसेवक तानाजी वनवे यांनी पक्षाचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपल्याला धक्काबुक्की करताना मोर्चात जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप केलेत. याप्रकरणी तानाजी वनवे यांनी यासंदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केलीय. 

वनवे यांनी केलेले सर्व आरोप शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी फेटाळून लावलेत. पोलिसांनी तानाजी वनवे यांच्या तक्रारीचवरुन विकास ठाकरेंच्या विरोधात धमकी देऊन शिवीगाळ केल्याचा अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. 

नागपुरात विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी गट या गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धुसफूस सुरु आहे. त्याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी तयारी करण्याऐवजी काँग्रेसमधील  
अंतर्गत वादमुळे पक्षाची पार वाताहत झाली असली तरी पक्षाचे नेते अजूनही एकमेकांविरुद्ध लढण्यातच व्यस्त आहेत.