'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..."

Nana Patole vs Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patl) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.  

शिवराज यादव | Updated: May 3, 2023, 11:40 AM IST
'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..." title=

Nana Patole vs Sanjay Raut: राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी मनधरणी सुरु आहे. शरद पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. पण याचवेळी काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

"संजय राऊतांनी चोमडेगिरी बंद करावी. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. ज्या कुटुंबाने बलिदान दिलं आहे, पंतप्रधानपद सोडलं आहे, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडून दुसऱ्याला दिलं आहे," अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, त्यांनी इतर कोणत्या पक्षाचं प्रवक्ते व्हावं याबद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोलले आहेत. त्यामुळे त्यांनी चोमडेगिरी बंद करावी असं नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान नाना पटोले यांनी यावेळी शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेवर जास्त भाष्य करण्यास नकार दिला. शरद पवार मोठे नेते आहे, एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहे त्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे असं ते म्हणाले. त्यांच्या पक्षाचा त्यानी निर्णय घ्यावा. पुरोगामी विचाराला मानणारा तो पक्ष आहे. राष्ट्रवादी भाजपासोबत जाईल असं वाटत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

तसंच मोठया प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पुण्यातील वज्रमूठ सभा होईल की नाही हे बैठकीत चर्चा करुन ठरवू अशी माहिती त्यांनी दिली. अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. याची सुरवात नागपुरातून करू असंही ते म्हणाले. 

संजय राऊतांचं प्रत्युत्तर - 

नाना पटोले यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की "चाटुगिरी कोण करतं हे येणारा भविष्यकाळ ठरवेल. शिवसेनेने कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. तुम्ही महाविकास आघाडीत आहात, त्यामुळे आपल्या तोंडावर बंधन घाला. आम्ही तुमच्याविषयी बोलू लागल्यास चोमडे कोण आणि चाटू कोण हे कळेल. पण परवा मला व्यासपीठावर भेटले तेव्हा चांगलं बोलले होते".