पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि आर.जे मलिष्का सूत्रसंचलन करत होते. विद्यार्थ्यांकडून राहुल गांधी यांच्या खासगी तसेच राजकीय वाटचालीबाबत प्रश्न विचारले जात होते. यावेळी सुबोध भावे यांनी मजेशीरपणे राहुल गांधींना मी तुमच्यावर आधारित बायोपिक करत असल्याचं सांगितलं. या बायोपिकसाठी दिग्दर्शक, कॅमेरामॅनही निश्चित झाल्याचं सुबोधने सांगितलं. परंतु या चित्रपटासाठी हिरोइन, अभिनेत्री मात्र निश्चित करण्यात आलेली नाही. मला यासाठी कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करावं हा प्रश्न पडला आहे. तर तुम्हाला कोण वाटतं, कोण असावी तुमच्यावरील चित्रपटातील हिरोइन? सुबोध भावेच्या या प्रश्नावर राहुल गांधींवरही मजेशीर उत्तर दिलं. सध्या मी माझ्या कामात अतिशय व्यस्त आहे. मी कामाशीच गुंतलेलो असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. त्यावर सुबोध भावेनी बायोपिकमध्ये मी हिरोइनचं नाव वर्क असं ठेवत असल्याचं गमतीशिररित्या म्हटलं.
राहुल गांधी यांनी आज पुण्यात ५ हजार विद्यार्थ्यांशी संवाद सांधला. या प्रश्नांमधून राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण देण्याबाबतही त्यांनी सांगितले. राजकारणात नेत्यांना निवृत्ती का नाही? एका विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर राहुलनी नेत्यांनाही निवृत्ती हवी. निवृत्तीसाठी त्यांचे वय ६० वर्ष असावे असे त्यांनी म्हटलंय. मलिष्काने राहुल गांधींसोबत रॅपिड फायर करताना, आता सध्या कोणता चित्रपट बघितला असा प्रश्न विचारला? त्यावर राहुल गांधींनी सध्या कोणताही चित्रपट पाहिला नसल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक वर्षात मी चित्रपट पाहिलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी एका विद्यार्थ्याने तुमचे आणि प्रियंका गांधींचं नातं कसं आहे असा सवाल केला. त्यावर राहुलने आमची कधी भांडणं होत नाही. आम्ही नेहमी एकमेकांसोबत असतो. माझी बहिण माझी सर्वात जवळची मैत्रिण असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.