मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यात आज एका दिवसातले सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एका दिवसात राज्यात कोरोनामुळे १०५ जणांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,८९७ एवढी झाली आहे. राज्यात आज झालेल्या १०५ मृत्यूंपैकी मुंबईत ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९, नवी मुंबईत ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबादमध्ये ४, नाशिकमध्ये ३, सोलापुरात ३, साताऱ्यात २, अहमदनगरमध्ये १, नागपूरमध्ये १, नंदुरबारमध्ये १, पनवेलमध्ये १, वसई-विरारमध्ये १ जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधल्या एका व्यक्तीनेही मुंबईमध्येच प्राण गमावले.
आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूंमध्ये ७२ पुरुष आणि ३३ महिला आहेत. आजच्या एकूण मृत्यूंपैकी ६० वर्ष आणि त्यावरील ५० रुग्ण आहेत, तर ४०-५९ वयातले ४५ रुग्ण आणि ४० वर्षांखालील १० जण आहेत. १०५ मृत्यूंपैकी ६६ जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग असे जोखमीचे आजार होते.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागच्या २ दिवसांमधील आहेत, तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साताऱ्याचे २, अहमदनगरचा १ आणि नंदुरबारचा १ मृत्यू आहे.
राज्यात दिवसभरात २,१९० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे, यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५६,९४८ एवढी झाली आहे. राज्यात आज एकूण ऍक्टिव्ह रुग्ण ३७,१२५ एवढे आहेत. आज ९६४ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडून देण्यात आलं आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण १७,९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यामध्ये रुग्ण दुपटीचा वेग हा मागच्या आठवड्यात ११.५ दिवस एवढा होता, तो आता १४.७ दिवस एवढा झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ३१.५ टक्के एवढं आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या १२.४ टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे.