राज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी

कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र,  

Updated: Apr 15, 2020, 12:25 PM IST
राज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेले नियम तोडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका भविष्यात अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. राज्यात संचारबंदी, लॉकडाऊन आहे. परंतु लोक नियम मोडत आहेत. त्यामुळे राज्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. डोंबिवली, पिंपरीतील भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी दिसून येत आहे. तर अमरावतीत बँकेसमोरही नागरिकांची लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

डोंबिवलीत अक्षरश: फज्जा

डोंबिवलीत लॉकडाऊनचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. १४ तारखेपर्यंत भाजीपाला मार्केट बंद होती, परंतु ती आज सुरू झाल्यानंतर लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ही गर्दी पाहिल्यानंतर प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या त्या भागात मोकळ्या जागेत मार्केट भरवण्याऐवजी डोंबिवली पश्चिम येथील मार्केटही पूर्वला आणले आहे. तरीही गर्दी कायम आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी उसळली

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काल एकाच दिवसात आठ कोरोना रुग्ण आढळले असून शहरात कोरोनाचे ४३ रुग्ण झाले आहेत. मात्र असे असताना सोशल डिस्टन्सिंगचे भान नागरिकांमध्ये नाही अशी परिस्थिती आहे. लोकडाऊन ३ मेपर्यंत वाढल्यानंतर पिंपरतल्या होलसेल किराणा मालाच्या दुकानांपुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकानदार ग्राहकांना सूचना देत होते मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

मेळघाटात बँकांसमोर मोठी रांग

अमरावतीमधील मेळघाटातील धारणीत स्टेट बैंक ऑफ इडिया आणि बैंक ऑफ महाराष्ट्र समोर सोशल डिस्टन्सचा फज्जा दिसून येत आहे. शेकडो महिलांची बँकेबाहेर गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉक डाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबाचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकार कडून देशभरातील लाखो महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी पाचशे रुपयांची रक्कम ही सरकार कडून टाकण्यात आली आहे.  दरम्यान आता ती रक्कम काढण्यासाठी अतिदुर्गम मेळघाटातील धारणीत ऑफ इडिया आणि बैंक ऑफ महाराष्ट्र समोर शेकडो महिलांनी तुफान गर्दी केली आहे. येथे सोशल डिस्टनचा फज्जा उडालेला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब कुटुंबाना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कडून जनधन खाते असलेल्या महिलेच्या खात्यात पाचशे रुपयांची रक्कम टाकण्यात आली आहे. त्यात महिलांच्या हाताला काम नसल्याने ते पैसे काढण्यासाठी महिलांनी सोशल डिस्टनचे कुठलेही नियम न पाळत नसल्याचे दिसून येत आहे. महिला जीवावर उदार झाल्याचे चित्र दिसत आहे.