राज्यात २४ तासात एवढ्या रुपयांची दारूविक्री

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.

Updated: May 6, 2020, 06:26 PM IST
राज्यात २४ तासात एवढ्या रुपयांची दारूविक्री title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या ४० दिवसांनंतर राज्यामध्ये दारूविक्रीला सोमवारपासून परवानगी देण्यात आली. यानंतर तळीरामांनी दारूच्या दुकानांबाहेर लांबच लांब गर्दी केली. अनेक ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पायदळी तुडवण्यात आले.

कोरोना संकटात आता वाइन शॉपचा पोलिसांवर ताण

सोमवारी दारूविक्री सुरू झाल्यानंतर मंगळवारपर्यंत राज्यात अंदाजे ६२.५५ कोटी रुपयांची दारूविक्री झाली. मंगळवारपर्यंत अंदाजे १६.१० लाख लीटर दारूची विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीला सुरुवात करण्यात आली. तर ९ जिल्ह्यांमध्ये दारूविक्री सुरू झाली नाही. प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यामुळे लातूर आणि उस्मानाबादमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दारूची होम डिलिव्हरी करणार 'हे' राज्य... लाँच केलं ऍप

महाराष्ट्रात दारूविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या १०,८२२ एवढी आहे, यातली ३,५४३ दारूची दुकानं सुरू झाली होती. कंटेनमेन्ट झोन वगळता रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्य सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली होती. पण लोकं गर्दी करू लागल्यामुळे मुंबईतील दारूविक्री थांबवण्यात आली.

गर्दीमुळे दारूविक्री बंद झालेले जिल्हे 

मुंबई, उस्मानाबाद, लातूर 

दारूविक्री सुरू असलेले जिल्हे 

पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, बुलडाणा

दारूविक्री बंद असलेले जिल्हे 

अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, ठाणे