मुंबई : देशात कोरोनाची लागण झालेले 73 रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची लागण ही दुबईतून फिरून आलेल्या दाम्पत्यातून झाली. कोरोना व्हायरसचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे पर्यटन आणि पर्यटकांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. असं असताना आता ट्रॅव्हल्स कंपन्या मात्र नागरिकांना वेढीस धरत आहेत.
कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरातील सर्वच ठिकांणांमध्ये शिरकाव केला आहे. अशावेळी पर्यटकांनी पर्यटनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मुंबई-पुण्यात कोरोनाने दुबईत फिरायला गेलेल्या नागरिकांमार्फत प्रवेश केला. अशावेळी राज्याबाहेर फिरायला जाणं देखील धोक्याच असल्याच सांगण्यात येत आहे.
सुट्यांच्या काळात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी आपला निर्णय बदलून फिरायला जाण्याचे प्लान्स पुढे ढकलले आहेत. अशावेळी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या मात्र नागरिकांना वेढीस धरत आहेत. पर्यटकांना एका बाजूने आरोग्याची धास्ती असताना आता आर्थिक फटका देखील बसणार असं समोर येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील सहा कुटुंबियांनी नैनीताल येथे केसरी ट्रॅव्हल्सकडून बुकिंग केलं होतं. मात्र आता जगभरात कोरोनाच सावट असताना राज्याबाहेर पडणं धोक्याचं आहे. अशावेळी त्यांनी केसरीशी संपर्क साधून हे बुकिंग पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र कंपनीकडून बुकिंग पुढे ढकलण्यास पूर्णपणे नकार दिला. तुम्ही ठरलेल्या वेळेत फिरायला जा अन्यथा बुकिंग रद्द करा, अशी जबरदस्ती करण्यात आली. बुकिंग रद्द केल्यावर मात्र भरलेल्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम कापून फक्त 25 टक्के रक्कम परत दिली जाणार,अशी माहिती विनोद चौगुले यांच्याकडून देण्यात आली.
प्रत्येकजण दररोजच्या धावपळीतून थोडा मोकळा वेळ मिळावा म्हणून फिरायला जातो. अशावेळी या जागतिक साथीच्या रोगाची भीती मनात घेऊन फिरायला जाणं हे योग्य नाही. याकरता आम्ही हे बुकिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, केसरीकडून आम्हाला अशी उत्तर देण्यात येत असल्याचं ऋतुजा चौगुले यांनी सांगितलं.
जीवापेक्षा आर्थिक फायदा महत्वाचा नाही, टूर कंपन्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, असा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी टूर कंपन्यांना सल्ला दिली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांना सहली रद्द करण्याबाबत आवाहन केेले आहेच. मात्र, मंत्रीमंडळात याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं देखील आदित्य ठाकरेंनी सांगितलं. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून जर लूट सुरु असेल तर त्याचीही दखल घेतली जाईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.