उस्मानाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

दिल्ली पानिपतमार्गे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

Updated: Apr 3, 2020, 12:18 AM IST
उस्मानाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : दिल्ली पानिपतमार्गे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसुर या गावात  पहिला रुग्ण आढळला आहे. बलसुर तालुक्यातील ३१ वर्षीय तरुण दिल्लीतील पानिपत येथून आला होता. त्याला काल उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संबंधित तरुण १२ जानेवारीला एक कार्यक्रमानिमित्त आपल्या पत्नीसह दिल्लीला गेला होता. २५ मार्च रोजी तो गावी परतला. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर गावकऱ्यांनी त्याला तपासणी करण्यासाठी आग्रह केल्यानंतर तो उमरगा उपजिल्हा रुग्णालयात  आपल्या पत्नीसह दाखल झाला होता. 

या तरुणाचे आणि त्याच्या पत्नीचे नमुने बुधवारी पुणे येथे पाठवण्यात आले होते. गुरुवारी रात्री  ९ वाजताच्या सुमारास त्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं.  एकूण ९ जणांचा रिपोर्ट आला आहे त्यात त्याच्या पत्नीचा रिपोर्ट नेगिटिव्ह आला आहे. सध्या या तरुणाला उमरगा येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे, त्याची प्रकृती चांगली असल्याचं सीएस यांनी सांगितलं आहे. या तरुणाच्या संपर्कात कितीजण आले याचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे.