कोरोनाचे सावट : एलटीटी, पुणे रेल्वे स्थानकावर गावाला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी

राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. मात्र, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

Updated: Mar 20, 2020, 09:02 PM IST
कोरोनाचे सावट : एलटीटी, पुणे रेल्वे स्थानकावर गावाला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी title=

मुंबई / पुणे : राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात ५२ रुग्ण बाधित असल्याचे पुढे आले. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. कोणीही गर्दी करु नये, आवश्यक असेल तर प्रवास करावा अन्यथा करु नये, असे सक्त आदेश दिले आहेत. जमाव बंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. असे असताना कोरोनाच्या भितीने अनेक जण गावाला जाण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र मुंबई आणि पुणे येथील रेल्वे स्थानकांवर दिसून आले. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

सध्याच्या परिस्थितीत प्रवास टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे.  तरी पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी आहे. बहुतेक ठिकाणी काम बंद असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने पुण्यातले लोक आपापल्या गावी जात आहेत. कोरोनामुळे राज्यातील महानगरांमधील ऑफिसेस बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत. त्यात कोरोनाची दहशत आहे. त्यामुळं सामान्य कष्टकरी माणसानं गावाकडे धाव घेतली आहे.

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे स्टेशनवर गावाकडं निघालेल्या प्रवाशांची तुफान गर्दी झालीय. मध्य रेल्वेनं मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द केल्यात. त्यामुळं अनेक प्रवासी स्टेशनवर येऊन थांबतायेत. किंवा पर्यायी गाडी पकडून गावाकडं जाताना दिसतायत. पुणे रेल्वे स्टेशनवर तर अनारक्षित तिकीट खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्यात. रेल्वेनं या प्रवाशांच्या प्रवासाचं नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.

दरम्यान, संपूर्ण जगाचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. या लढ्यात महाराष्ट्राला पहिला विजय मिळताना दिसतोय. महाराष्ट्रातला कोरोनाचे पाच रुग्ण बरे झालेत. आणि इतर रुग्णांची तब्येतही झपाट्यानं सुधारत आहे.