महाराष्ट्राने कोरोना रुग्णसंख्येत चीनला मागे टाकले

मुंबईत रुग्णसंख्या ५० हजार पार, दिवसभरात ६४ बळी

Updated: Jun 8, 2020, 09:02 PM IST
महाराष्ट्राने कोरोना रुग्णसंख्येत चीनला मागे टाकले  title=

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८८ हजार ५२८ इतकी झाली असून आतापर्यंत ३ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहचली आहे.

ज्या देशातून कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८३ हजार ३६ इतकी झाली आहे. चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. वुहान शहर असलेल्या हुबेई प्रांतात सर्वाधिक ६८ हजार १३५ रुग्ण आढळले आणि त्यापैकी ४५१२ रुग्णांचा मृत्यू झाला. चीनमध्ये ७८  हजार ३३२ लोक बरे झाले असून देशात ४ हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राने चीनला रुग्णसंख्येच्या बाबतीत मागे टाकले असून राज्यात ८८ हजार ५२८ रुग्ण आहेत आणि त्यापैकी ४० हजार ९७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ३१६९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज २ हजार ५५३ रुग्णांची वाढ झाली आहे आणि १०९ जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत ५० हजार पार

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ८५ इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत १७०२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात ६४ जणांचा बळी गेला आहे.

पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार ६२ इतकी झाली आहे. त्यापैकी ५ हजार १८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात पुण्यात १८१ रुग्ण वाढले तर १६६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात आतापर्यंत ३९१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

 

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६.२८ टक्के इतके आहे. तर मृत्युचा दर ३.५७ टक्के इतका आहे.