शिर्डी : Coronavirus Update News : राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने कोविड निर्बंधात शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत चिंता वाढविणारी बातमी हाती आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आणखी 21 गावात लॉकडाऊन लावण्यात येत आहे. ( Lockdown in 21 villages in Ahmednagar) या 21 गावांत 14 ते 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासूनच या लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. (Lockdown in Ahmednagar)
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोज 500 ते 800 च्या दरम्यान नवीन रुग्ण बाधित होत आहेत. नगर शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 10 पेक्षा ज्यास्त रुग्ण असलेल्या गावात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यात 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता यात आणखी 21 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नाही तर या लॉकडाऊन लागलेल्या गावात जमावबंदीही असेल. गावात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अहमदनगर, पारनेर, कोपरगाव, नेवासा, अकोले, श्रीगोंदा आदी तालुक्यांतील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात काल 2,219 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात 3,139 रुग्ण बरे झाले आहेत. तर 49 जणांचा मृत्यू झाला. आता राज्यात 29,555 इतके सक्रीय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 65,83,896 रुग्ण झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 64,11,075 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजपर्यंत 6,05,46,572 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.