बारामतीत नगरसेवकावर गुन्हा, अधिकाऱ्याला केली दमदाटी

वजन मापे निरीक्षकांना दमदाटी केल्याने बारामतीत नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Jan 9, 2019, 07:24 PM IST
बारामतीत नगरसेवकावर गुन्हा, अधिकाऱ्याला केली दमदाटी title=

पुणे : वजन मापे निरीक्षकांना दमदाटी केल्याने बारामतीत नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माळेगाव कारखान्याच्या वजनकाट्यावर कारवाई केल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यावर वजन मापे निरीक्षकांनी कारवाई केली होती. ही कारवाई का केली, असा जाब विचारत वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांना धमकावल्याप्रकरणी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील सस्ते यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वजनात तफावत आढळल्याने माळेगाव कारखान्याचे वजनकाटे सील करण्यात आले होते. अयोग्य वजन काटे वापरुन फसवणूक होत असल्याचा प्रकार उघड झाल्याने अधिकाऱ्यांनाच धमकवल्यात आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

छाया - Sunil Dadasaheb Saste फेसबुक पेज

बारामतीतील वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांनी काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी केली होती. यावेळी वजनात तफावत आढळल्याने त्यांनी पुनर्रपासणी करण्याबाबत कारखान्याला नोटीस बजावली. त्याचवेळी दोन वजनकाटे सील केले होते. त्यानंतर काल नगरसेवक सुनील सस्ते हे आपल्या सहकाऱ्यासमवेत अगरवाल यांना भेटायला गेले. त्या ठिकाणी त्यांनी अगरवाल यांना माळेगाव कारखान्यावर कारवाई का केली, असा जाब विचारत त्यांना दमदाटी केली.
 
याबाबत अगरवाल यांनी बारामती शहर पोलिसांमध्ये नगरसेवक सुनील सस्ते यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरुन नगरसेवक सुनील सस्ते यांच्यासह अन्य एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.