कोल्हापूर : खासदार संभाजी राजे यांच्यांच्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी टीका केली. त्यानंतर यांना धमकी दिल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. आता या वादात सकल मराठा समाजाने उडी घेतली आहे. रामदास कदम यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलताना आब राखून बोलावे आणि केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीन चिखळण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जाते, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोणाची लाचारी करू नका, असे संभाजी राजे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. यावरून या दोन नेत्यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. यामध्ये आता सकल मराठा समाजाने उडी घेत रामदास कदम यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करताना इशारा दिला आहे. कदम यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा स्पष्ट इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
भाजपने महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीची बांधणी करण्यासाठी नवी दिल्लीत राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची बैठक झाली होती. त्यावेळी खासदार संभाजी राजे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थानपक अध्यक्ष आणि भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणेही उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचे श्रेय खासदार नारायण राणे यांना देऊ केले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी संभाजी राजे यांना टोला हाणला होता. कदम टोला हाणताना म्हणालेत, 'संभाजी राजे यांनी लाचारी पत्करू नये'. यानंतर संभाजी राजे यांचा सचिव योगेश याने फोनवरून रामदास कदम यांना धमकावले होते. त्याने यावेळी अर्वाच्च भाषा वापरली होती. याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
दरम्यान, संभाजी राजे यांनी रामदास कदम यांच्या टीकेला जास्त महत्व दिलेले नाही. रामदास कदम यांना माझ्याविषयी काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही, असे सांगून टीकेकडे दुर्लक्ष केले. तर धमकीबाबत त्यांनी सांगितले की, मी कोणाला काहीही सांगितलेले नाही. माझी तशी संस्कृती नाही. जे झाले ते चुकीचे होते, असे सांगून मोठेपणाही दाखवला.