घोड्यावरील शहाणे, नुकसान पंचनाम्यांसाठी अजब प्रकार

बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. 

Updated: Dec 27, 2017, 03:30 PM IST
घोड्यावरील शहाणे, नुकसान पंचनाम्यांसाठी अजब प्रकार title=

औरंगाबाद : बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून वैजापूर येथे अधिकाऱ्यांनी घोड्याचा आधार घेतला आहे. 

बोंडअळीमुळे तालुक्यातील ७६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झालयं या नुकसानीचे पंचनामे करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. हे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलीस पाटील यांची पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत. 

पण पायी फिरून दहा दिवसात हे काम पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने अधिकाऱ्यानी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करण्याची शक्कल लढवली आहे. तालुक्यातील अंचलगाव येथे मंगळवारी तलाठी पैठणपगारे व इतर कर्मचारी चक्क घोड्यावर फिरून हे पंचनामे पूर्ण करत असल्याचे दिसले. अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून ग्रामस्थ चांगलेच अचंबित झाले.