अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? 'या' प्रकरणात कोर्टाने बजावली नोटीस

Abdul Sattar : मंत्रीपद मिळण्याआधी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नव्या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 25, 2022, 11:34 AM IST
अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? 'या' प्रकरणात कोर्टाने बजावली नोटीस title=

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : गेल्या काही दिवसांपासून वादात अडकत असलेले शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या पुन्हा अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. मंत्रीपद मिळण्याआधी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे टीईटी (TET Scam) म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नवीन जमीन घोटाळा प्रकरणाचा वाद हायकोर्टाच्या दरबारात पोहोचला आहे. या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री असताना सत्तार यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

कोर्टाने बजावली नोटीस

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशिम शहराला लागून असलेली 37 एकर गायराण जमीन सत्तेचा दुरुपयोग करुन एका खासगी इसमाला दिल्याचा धक्कादायक प्रकार कोर्टात दाखल केलेल्या जनहित याचीकेतून उघड झाला आहे. ही जनहित याचिका वाशिमचे श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी दाखल केली होती. त्यासंदर्भात 22 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याची माहिती श्याम देवळे यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे सध्या एकच खळबळ उडाळी आहे. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील प्राथमिक पुरावे लक्षात घेता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच, महसूल व वन विभागाचे सचिव, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अमरावती विभागीय आयुक्त,वाशिम जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व योगेश खंडारे यांना नोटीस बजावून याचिकेतील आरोपांवर येत्या 11 जानेवारी 2023 पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

22 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार गायरान जमीन कोणत्याही खासगी व्यक्तीला विकता येत नाही किंवा कोणत्याही कामासाठी देता येत नाही. मात्र, असे असतानाही सध्याचे कृषीमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी जवळच्या व्यक्तीला घोडबाभुळ येथील 37.19 एकर शासनाची गायरान जमीन दिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी या जागेच्या व्यवहारास स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

टीईटी घोटाळ्यातही नाव?

2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. या घोटाळ्यात राज्य परीक्षा परिषदेचे मोठे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्यांच्या संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली होती. याच यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे असल्याचे म्हटले जात होते. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींची नावे असलेली यादी आल्याने खळबळ उडाली होती.