सांगलीत १२ वर्षांच्या मुलाला मगरीने पाण्यात ओढून नेले; शोधकार्य अद्याप सुरु

आकाशचे कुटुंबीय नदीकिनारी असलेल्या वीटभट्टीवर काम करतात.

Updated: May 16, 2019, 09:05 PM IST
सांगलीत १२ वर्षांच्या मुलाला मगरीने पाण्यात ओढून नेले; शोधकार्य अद्याप सुरु title=

सांगली: सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मगरीने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आकाश मारुती जाधव असे या मुलाचे नाव असून तो १२ वर्षांचा होता. मगरीने पाण्यात ओढून नेल्यानंतर अजूनपर्यंत आकाशचा पत्ता लागलेला नाही. सध्या वनविभागाचे अधिकारी आणि गावकरी बोटीतून आकाशचा शोध घेत आहेत. 

येथील मौजे डिग्रज गावाजवळ ही घटना घडली. आकाशचे कुटुंबीय नदीकिनारी असलेल्या वीटभट्टीवर काम करतात. गुरुवारी दुपारच्या सुमारास आकाश आपल्या बहिणीसोबत नदीवर आला होता. बहीण नदीवर कपडे धुवत असताना आकाश नदीत पोहत होता. यावेळी मगरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला नदीमध्ये ओढून नेले. या घटनेनंतर तब्बल चार तास  वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुलाचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. शोध पथकाला १० ते १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले असून मात्र अद्याप मुलगा दिसला नाही.

यापूर्वी औदुंबरमधील नदी पात्राच्या परिसरातही मगरीने अशाचप्रकारे लहान मुलाला ओढून नेले होते. शोधमोहिमेनंतर मुलाचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.